जळगाव प्रतिनिधी । शहरातील काव्यरत्नावली चौकात आज पहाटे (एमएच १९ सीझेड १५३२) या क्रमांकाची कार झाडाला धडकली. सुदैवाने वेळीच कारमधील एअरबॅग उघडल्याने कारमधील तरुणांना दुखापत झालेली नाही.
अधिक माहिती अशी की, शहरातील नंदनवन कॉलनी येथे आर.बी. हिंगणेकर हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाचे काव्यरत्नावली चौकात एचडीएफसी बँकेच्या बाजुला फोटोग्राफीचा व्यवसायाचे ऑफिस आहे. गुरुवारी २४ डिसेंबर रोजी ऑफिसमध्ये रात्री उशीरापर्यंत काम सुरू होते. यादरम्यान हिंगणेकर यांचा मुलगा रक्षण हा शिकण्यासाठी घरुन त्यांची (क्रमांक एम.एच. १९ सी.झेड १५३२) ही कार घेऊन आला होता. शुक्रवारी पहाटेच्या उठल्यानंतर रक्षण हा त्याच्या सोबतच्या मित्रांसोबत तो काव्यरत्नावली चौक रस्त्यावर कार शिकत होता. शिकताना एचडीएफसी बँकेसमोर रक्षणचा पाय अचानक ब्रेक करून रेसवर गेला. व कारवरील नियंत्रण सुटून भरधाव कार ही काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेलगत असलेल्या वृक्षावर जाऊन धडकली. दरम्यान धडक देताच कारमधील एअरबॅग उघडली त्यामुळेच कारमधील रक्षण सह त्याचे दोघे मित्र यांना कुठलीही दुखापत झाली नाही. धडक इतकी जोरदार होती की ज्या झाडाला धडक दिली होती त्या झाडाची काहीवेळाने कारवर भली मोठी फांदी तुटून पडली. अपघाताच्या मोठ्याने झालेल्या आवाजाने सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या सर्व नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती.
आज सकाळी महापालिकेचे कर्मचारी यांनी रस्त्यावर झालेल्या अपघातात झाड तुटल्याने रहदारी खोळंबली होती क्रेनच्या मदतीने वाहतूक सुरळीत करून अपघातातील वाहन पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर शेवटचे वृत्त आले तोपर्यंत याबाबत पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरू होते.