जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यात अटकेत असलेला सूरज झंवर याच्या कार्यालयात आमदार राजूमामा भोळे यांचे कोरे लेटरहेड आढळून आले आहेत. माजी मंत्री गिरीश महाजनांच्या पाठोपाठ आमदार भोळेंचे लेटरहेड झंवर कुटुंबाकडे आढळून आल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.
बीएचआर घोटाळा प्रकरणी प्रमुख सूत्रधार सुनील झंवर व अवसायक जितेंद्र कंडारे हे फरार आहेत. तर सुनील झंवरचा मुलगा सूरज याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेली आहे. त्याला अटक करतांना पोलिसांच्या पथकाने जप्त केलेल्या सामग्रीत आमदार राजूमामा भोळे यांच्या नावाचे कोरे लेटरपॅडदेखील आहे. या शिवाय काही कर्जदारांची प्रकरणे, राजपत्रित अधिकार्यांच्या नावाच्या शिक्क्यांचा समावेश आहे.
याआधी सुनील झंवरची मालकी असणार्या साई मार्केटींगच्या कार्यालयात माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचे कोरे लेटरहेड आढळून आले होते. या पाठोपाठ आता त्यांच्या घरी आमदार राजूमामा भोळे यांचे लेटरहेड आढळून आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.