जिल्हा दूध संघ निवडणुकीत रंगणार ‘बिग फाईट’ !

जळगाव-जितेंद्र कोतवाल ( लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट ) | राज्य शासनाने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठविल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील यातील पहिला मुकाबला हा जिल्हा दूध संघात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादीत या संस्थेची शेवटची सर्वसाधारण सभा काल चेअरमन मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या संचालक मंडळाची मुदत ही दोन दिवसांनी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी संपत आहे. आणि कालच राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील बंदी उठविली आहे. यामुळे दूध संघातील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. तथापि, शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३० सप्टेंबर पर्यंत स्थगिती देण्यात आली होती. आता ही स्थगिती उठणार असून सहकार खात्याने याबाबतचे अधिकृत निर्देश जारी केले आहेत.

जिल्हा दूध संघाच्या गेल्या पंचवार्षीक निवडणुकीत तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय पॅनलची निवड करण्यात आली होती. यानंतर संस्थेच्या चेअरमनपदी मंदाताई खडसे या विराजमान झाल्या होत्या. मुदतवाढ मिळाल्याने त्यांनी तब्बल सुमारे सात वर्षे याचा कार्यभार सांभाळला. मध्यंतरी राज्यात सत्तांतर झाल्यामुळे यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, कोर्टाच्या निर्णयानंतर पुन्हा संचालक मंडळाला अधिकारी मिळाले होते. आता दोन दिवसांनी विद्यमान संचालक मंडळाची मुदत संत असून सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती देखील उठविण्यात आलेली आहे. यामुळे दूध संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहे.

यंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांची अर्थात, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या पॅनलची धुरा ही एकनाथराव खडसे यांच्याकडेच असेल अशी शक्यता आहे. तर, सत्ताधार्‍यांकडून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन हे दूध संघातील सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतील हे स्पष्ट आहे. यात नेमके कुणाला यश मिळणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Protected Content