जळगाव प्रतिनिधी । जळगावात होणार्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम लेखक व समीक्षक प्रा. भास्कर चंदनशिव यांची निवड करण्यात आली आहे.
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या एकोणीसव्या वर्धापन दिनानिमित्त जळगावात पहिल्या अखिल भारतीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या अध्यक्षपदी लेखक प्रा भास्कर चंदनशिव (कळंब, जि. उस्मानाबाद) यांची निवड करण्यात आली आहे.
प्रा चंदनशिव यांच्या नावावर आजमितीस एकूण १४ ग्रंथ संपदा प्रकाशित आहे. त्यात कथासंग्रह, समीक्षा ग्रंथ, संपादने अशी ग्रंथ असून ३ राज्य शासनाचे पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनचा पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कारांनी त्यांना गौरवले आहे. त्यांनी दोन वेळा शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदासह, मराठवाडा साहित्य संमेलन, अस्मिता दर्शन साहित्य संमेलन, मसापचे साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदे भूषवलेली आहे.
येत्या मार्चमध्ये अशोक कोतवाल यांच्या अध्यक्षतेखाली जळगावात संमेलन होणार आहे. प्रा. डॉ. किशोर सानप यांच्या अध्यक्षतेखाली अष्टपैलू पद्मश्री डॉ. भवरलाल जैन एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन तर प्रा दीपमाला कुबडे प्रायोजित प्रा डॉ. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याचे, मंडळाचे सल्लागार साहेबराव पाटील, सचिव डी. बी. महाजन, उपाध्यक्ष प्रवीण लोहार, मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी कळविले आहे.