जळगाव प्रतिनिधी । येथील ओम क्रिटीकल केअर सेंटरला देण्यात आलेली कोविड टेस्टची परवानगी जिल्हा शल्य चिकित्सकांनी निलंबीत केली आहे.
कोविड-१९ ची तपासणी करुन त्याची माहिती आसीएमआरच्या पोर्टलवर अद्यायावत न केल्याबद्दल ओम क्रिटिकल सेंटरला देण्यात आलेली कोविड रुग्ण तपासणीची परवानगी जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर यांनी निलंबित केली आहे. यासोबत नॉन कोविड रुग्णांना रेमडेसीव्हर व फॅबीफ्ल्यू ही औषधी वापरल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत तात्काळ खुलासा करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.
ओम क्रिटिकल सेंटरमध्ये आतापर्यंत १ हजार ४०१ तपासण्या करण्यात आल्या; परंतु त्यापैकी केवळ १ हजार २८१ तपासण्यांचीच माहिती आयसीएमआरच्या पोर्टलवर अपडेट करण्यात आल्या आहेत. उर्वरित ११० तपासण्याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. यामुळे या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक तथा कोविड-१९ चे नोडल ऑफिसर डॉ. एन. एस. चव्हाण यांनी गुरुवारी ओम क्रिटीकलला भेट दिली असता या केअर सेंटरमध्ये रेमडेसीव्हर व फॅबीफ्ल्यू ही औषधी आढळून आलीत. जिल्ह्यात या औषधाचा तुटवडा भासता असताना नॉन कोविड रुग्णांना ही औषधी का वापरण्यात आली? याबाबतचा खुलासा करण्याचे निर्देश देखील रूग्णालयाच्या प्रशासनाला देण्यात आले आहेत.