भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी आपण अजितदादा पवार यांच्यासोबत जात असल्याची घोषणा केली आहे.
आज राज्याच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार हे आपल्या सहकार्यांसह राज्य मंत्रीमंडळात सहभागी झाले. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर त्यांच्यासह एकूण नऊ मंत्र्यांची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत बहुतांश आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर, बहुतेक पदाधिकारी त्यांच्या सोबत जातील अशी शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता भुसावळ तालुक्यातल्या साकेगाव येथील रहिवासी तसेच युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेतील पक्षाचे माजी गटनेते रवींद्र नाना पाटील यांनी आपण अजितदादा पवार यांच्यासोबत जाणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी आपल्या नवशक्ती आर्केडमधील कार्यालयाच्या बाहेर आपल्या सहकार्यांसह जोरदार आतषबाजी करून आजच्या शपथविधीचे स्वागत केले. आणि, आपण आधीपासूनही अजितदादांच्याच सोबत असून पुढे देखील राहणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकारे भूमिका जाहीर करणारे ते जिल्ह्यातील पहिले पदाधिकारी ठरले आहेत.