जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या पंधरवाड्यात तीन खुन झाल्यानंतर आज शहरात पुन्हा एकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मेहरूण तलावाच्या काठावर अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, मेहरूण तलावाच्या काठावर एका प्रौढाचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीचे वय साधारणपणे पन्नासच्या सुमारास असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. या मृतदेहाचा चेहरा हा दगडाने ठेचल्याचे दिसून येत असून दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मेहरूण तलावाच्या काठावरील खुनाची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन प्राथमिक चौकशीला प्रारंभ केला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोवर या प्रकरणी पंचनामा करण्याचे काम सुरू होते. गेल्या पंधरा दिवसांमध्ये जळगाव शहरात लागोपाठ झालेला हा चौधा खून असल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे.