Home Cities जळगाव जळगाव महापालिका निवडणूक : १९ प्रभागांत मतदानास प्रारंभ, दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव महापालिका निवडणूक : १९ प्रभागांत मतदानास प्रारंभ, दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराच्या राजकीय भवितव्याचा निर्णय घेणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये मतदार रांगा लावताना दिसत असून, एकूणच वातावरण शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध आहे.

महानगरपालिकेच्या १९ प्रभागांमध्ये ५१६ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असून, शहरातील संवेदनशील भागांत अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या एकूण ७५ जागांपैकी भाजप आणि शिंदे गटाच्या सेनेच्या प्रत्येकी ६ जागा अशा एकूण १२ जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ६३ जागांसाठी आज थेट लढत होत असून, ३२१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

मतदानाच्या पहिल्याच सत्रात राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला. आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लताताई सोनवणे, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील तसेच माजी महापौर सीमा भोळे यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदान करून नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदानाची वेळ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. मात्र, या वेळेपर्यंत मतदान केंद्रात प्रवेश केलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याची संधी दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

एकूणच शांततेत आणि उत्साहात सुरू असलेल्या या मतदानातून जळगाव शहराच्या पुढील विकासाची दिशा ठरणार असून, मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound