Home Cities जळगाव जळगाव मनपाचा मोठा निर्णय: प्लास्टिक बंदीचा नियम मोडल्यास २५ हजारांचा दंड

जळगाव मनपाचा मोठा निर्णय: प्लास्टिक बंदीचा नियम मोडल्यास २५ हजारांचा दंड


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जळगाव महानगरपालिकेने शहरात एकेरी प्लास्टिकच्या वापरावर कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला असून १ मार्च २०२६ पासून बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

जळगाव शहर महानगरपालिका येथे आयोजित बैठकीचे अध्यक्षस्थान महापौर दिपमाला काळे यांनी भूषविले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, मनपा सहाय्यक आयुक्त (आरोग्य), सर्व आरोग्य अधिकारी, प्लास्टिक असोसिएशनचे पदाधिकारी, जैन उद्योग समूहाचे प्रतिनिधी तसेच ‘माझे शहर माझी जबाबदारी’ या उपक्रमातील पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. बैठकीत शहरात प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबवण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

महापौरांनी स्पष्ट केले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणानुसार बंदी असलेल्या एकेरी प्लास्टिकची विक्री, साठवण किंवा वापर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार असून दंड न भरल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीदरम्यान पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आला. कंपोस्टेबल बॅग, कापडी पिशव्या आणि इतर पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्लास्टिक बंदी प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी जनजागृती मोहीम, तपासणी पथके आणि नियमित निरीक्षणाची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

महापौर दिपमाला काळे यांनी शहरातील नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत प्लास्टिकमुक्त जळगाव घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

 

 


Protected Content

Play sound