
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महानगरपालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या शर्यतीत आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. आज शिवकॉलनी येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या मुलाखतींच्या प्रक्रियेसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनिष जैन, माजी पालकमंत्री डॉ. सतिश पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, योगेश देसले आणि कल्पनाताई पाटील, महिला महानगराध्यक्षा मिनल पाटील यांसारख्या बड्या नेत्यांची उपस्थिती होती. या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच शिवकॉलनी परिसरातील पक्ष कार्यालयात इच्छुकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
मुलाखती दरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपल्या प्रभागातील समस्या आणि भविष्यातील विकासकामांचा ‘ब्लूप्रिंट’ नेत्यांसमोर सादर केला. अनुभवी कार्यकर्त्यांसोबतच अनेक नवीन चेहऱ्यांनीही यावेळी आपली दावेदारी ठामपणे मांडली. पक्षासाठी दिलेले योगदान आणि निवडून येण्याची क्षमता यावर नेत्यांनी भर दिल्याचे समजते.
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी जळगाव महानगरपालिकेत महायुती एकत्रित लढणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. “युतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल, मात्र आम्ही सर्व जागांवर तयारी पूर्ण ठेवत आहोत,” असे संकेत यावेळी स्थानिक नेत्यांनी दिले. युतीच्या निर्णयाची वाट न पाहता अजित पवार गटाने मुलाखती घेऊन आपली पूर्वतयारी पूर्ण केल्याचे दिसत आहे. आगामी काही दिवसांत महायुतीच्या जागावाटपाचा पेच सुटल्यानंतरच जळगावच्या राजकारणाचे नेमके चित्र स्पष्ट होईल.



