जळगाव: महानगरपालिकेतील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदांच्या नियुक्ती प्रक्रियेला आता नवा वळण मिळाले असून, प्रशासकीय पातळीवर या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी आणि विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने महापौरांनी प्रशासनाला पत्र दिले होते. या विनंतीची दखल घेत महापालिका प्रशासनाने नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत आता २५ मार्चपर्यंत वाढवली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५ नुसार रिक्त जागांवर सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यापूर्वी १७ मार्च ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र कागदपत्रांच्या जुळवाजुळव करण्यासाठी राजकीय पक्षांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता हा बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, इच्छुक उमेदवारांचे प्रस्ताव आणि नामनिर्देशन पत्रे आता २५ मार्च रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत.

सादर झालेल्या अर्जांची छाननी आणि पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता महानगरपालिका आयुक्तांच्या १३ व्या मजल्यावरील दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात नगरसचिव सतीश शुक्ला यांनी भाजप, शिवसेना, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व गटनेत्यांना अधिकृत पत्राद्वारे सूचित केले आहे. विहित मुदतीत आणि योग्य कागदपत्रांसह नावे सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, या निवडीत कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळते याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



