जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री रामनवमीचे औचित्य साधून ‘जळगाव सायकलिंग ग्रुप’तर्फे शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः ५० किलोमीटर सायकल चालवून रॅली पूर्ण केली आणि सायकलिस्टचा उत्साह द्विगुणित केला.
शहरातील चिमुकले राम मंदिर ते खेडी आव्हाणे गाव अशा मार्गावर काढण्यात आलेल्या या रॅलीत जळगाव सायकलिंग ग्रुपचे सुमारे ३० सभासद सहभागी झाले होते. यामध्ये धर्मादाय आयुक्त मोहन गाढे यांच्यासह अनेक मान्यवर सायकलिस्टनी सहभाग नोंदवला. रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर निरामय आरोग्याचा संदेश देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.

सायकल रॅली खेडी आव्हाणे गावात पोहोचल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी महापौरांचे आणि सायकलिस्टचे जोरदार स्वागत केले. यावेळी खेडी आव्हाणे गावाचे सरपंच कैलास चौधरी, आदर्श शेतकरी बाळू चौधरी, पोलीस पाटील, शरद सपकाळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर दीपमाला काळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
एकीकडे रामजन्मोत्सवाचा उत्साह आणि दुसरीकडे सायकलिंगच्या माध्यमातून तंदुरुस्तीचा संदेश, अशा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ५० किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल महापौरांचे आणि सर्व सदस्यांचे जळगावकरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



