जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नाट्यमय घटना घडून शामकांत सोनवणे यांची तर उपसभापतीपदी पांडुरंग पाटील यांची निवड करण्यात आली.
अलीकडेच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलने दणदणीत विजय संपादन केला होता. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ११ जागा मिळाल्या होत्या. तर भाजप-शिवसेनेच्या पॅनलला सहा तर एक अपक्ष निवडून आला होता. यामुळे मविआचा सभापती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यात सभापतीपदासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शामकांत सोनवणे आणि लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्यात चुरस होती. यातच भाजप-शिवसेनेतर्फे काही संचालकांना गळ टाकण्यात आल्याचे दिसून आले होते. मविआच्या काही संचालकांनी ना. महाजन यांची भेट घेतल्याने महाविकास आघाडी सावध झाली होती. यामुळे संचालकांना सहलीवर पाठविण्यात आले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास हे संचालक मजूर फेडरेशनमधील बैठकीला उपस्थित राहिले.
यानंतर दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. यात सभापतीपदासाठी तर उपसभापतीपदासाठी पांडुरंग पाटील उर्फ राजू सर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, याचप्रसंगी महाविकास आघाडीतर्फे लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांनी देखील सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. विहित कालावधीत त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक झाली. याप्रसंगी लक्ष्मण टेलर यांनी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला. तर या निवडणुकीत शामकांत सोनवणे यांना तब्बल १५ मते मिळून ते सभापतीपदी विराजमान झाले. तर पांडुरंग पाटील उर्फ राजू सर हे उपसभापती बनले.
या निवडीप्रसंगी माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे नेते गुलाबराव देवकर यांची देखील उपस्थिती होती.