जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तीन महिलांच्या खून प्रकरणातील आरोपी असणार्या बाळू उर्फ मुकुंदा बाबुलाल लोहार याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
किनगाव येथील बाळू उर्फ मुकुंदा बाबुलाल लोहार (वय ३० ) या तरूणाने तीन महिलांचा खून केल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघड झाली होती. २३ मे रोजी किनगाव येथील मराबाई सखाराम कोळी (वय ७५) या महिलेवर हल्ला झाला होता. यानंतर उपचार सुरू असताना ३१ मे रोजी कोळी यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी या गुन्ह्यात बाळू उर्फ मुकुंदा बाबुलाल लोहार (वय ३०, रा.किनगाव बुद्रूक) याला २७ जून रोजी ताब्यात घेतले होते. यानंतर त्याला पोलिस कोठडी मिळाली. सोमवारी त्याची पोलिस कोठडी संपली. यानंतर त्याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. तर, पोलिस कोठडीत आरोपीने खून करून चोरी केलेले दागिने ज्या सराफा व्यावसायिकास विक्री होते ते जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, आता खुनाच्या दुसर्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताबा मिळावा म्हणून पोलिसांनी न्यायालयाला अर्ज केला आहे. या प्रकरणाचा तपास यावल येथील पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विनोद गोसावी, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील, सलीम शेख, उल्हास राणे, सुनील जमदाडे हे करत आहेत.