Home क्राईम जळगावात पुन्हा गोळीबार : तरूणाचा मृत्यू, तीन जखमी

जळगावात पुन्हा गोळीबार : तरूणाचा मृत्यू, तीन जखमी

0
375

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील कांचन नगर भागात काल रात्री उशीरा झालेल्या गोळीबारात एका तरूणाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

या संदर्भातील माहिती अशी की, रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कांचन नगर भागात दोन गटांमधील वादाचे पर्यावसान गोळीबारात झाले. रात्री कांचन नक्षरातील विलास चौकात आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर कोळी यांच्यात शाब्दीक वाद झाले. यानंतर आकाश सपकाळे तसेच त्याच्या सोबत असलेल्या करण उर्फ तांडव राजपूत या दोघांनी त्यांच्याकडील पिस्तुलातून गोळीबार सुरू केला.

या गोळीबारात आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर या तरूणाला गोळी लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तथापि, उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. तर, या गोळीबारात गणेश रवींद्र सोनवणे, तुषार रामसिंग सोनवणे आणि सागर सुधाकर पाटील हे तीन जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरातील एका कंपनीच्या परिसरात अवैध दारू विक्रेत्याने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याला काही दिवस उलटत नाही तोच जळगाव शहरात पुन्हा गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसर हादरला आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याचे अधोरेखीत झाले आहे.

दरम्यान, गोळीबाराची घटना माहित पडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. डीवायएसपी नितीन गणापुरे, एलसीबीचे निरिक्षक राहूल गायकवाड यांनी तात्काळ त्ोथे भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. रात्री उशीरापर्यंत याबाबत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound