जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा विद्याप्रसारक मंडळात बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहार केल्या प्रकरणी अॅड. विजय भास्कर पाटील आणि हेमंत साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा विद्या प्रसारक मंडळात भोईटे आणि पाटील गटातील वाद सर्वश्रुत आहेत. या दोन्ही गटांनी एकमेकांवर अनेकदा आरोप केले असून हे वाद पोलीस स्थानकात गेले आहेत. यात आज पुन्हा एका नवीन प्रकरणाची भर पडली असून पाटील गटाच्या दोघा मान्यवरांच्या विरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे.
शहरातील भोईटे नगरात निलेश रणजीत भोईटे हे वास्तव्यास असून ते मराठा विद्याप्रसारक संस्थेचे मानद सचिव म्हणून दैनंदिन व प्रशासकीय कामकाज सांभाळत आहेत. त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्थानका फिर्याद दिली. यानुसार, संशयित विजय भास्कर पाटील व हेमंतकुमर साळुंखे यांच्यासह इतर संचालक निवडून आले नसून ते संस्थेचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच संस्थेची खोटे शिक्के तयार करुन ते प्रेसेडींग बुकवर मारलेले आहेत.
यात पुढे म्हटले आहे की, सन १९९८ ते २००२ या कालावधीसाठी चेंज रिपोर्ट सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दाखल केला होता. परंतु सदरचा फेरफार अर्जासोबत दाखल केलेले दस्ताऐवज व पुराव्यानिशी शाबीत न करु शकल्याने संशयितांचा चेंज रिपोर्ट दि. २२ फेब्रुवारी २००२ मध्ये फेटाळण्यात आला होता. खोट्या दस्तऐवजांच्या आधारे दि. १५ डिसेंबर १९९७ रोजी मिटींग असल्याचे भासवून दि. २८ डिसेंबर १९९७ रोजी निवडणुकीसाठी सभा घेतल्याचे प्रसेडींग बुक संशयितांनी तयार केले. संशयित हे कायदेशीररित्या संस्थेचे संचालक नसल्याने त्यांच्याकडे मूळ प्रेसेडींग बुक उपलब्ध नसतांना देखील त्यांनी सभेचा अजेंडा तयार करुन घेतला. तसेच खोटे इतिवृत्त तयार करुन विजय भास्करराव पाटील यांनी स्वत:ला मानद सचिव म्हणून निवडून आल्याबाबत घोषीत केले आहे. हे करण्यासाठी त्यांनी संस्थेचे खोटे प्रोसेडींग बुक तयार करुन त्यात खोेटे इतिवृत्त लिहीले. एवढेच नाही तर मिटींगमध्ये २२ संचालकांची निवड झाली असे देखील खोटे नमून करीत संस्थेचा ताबा घेण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला असल्याचे निलेश भोईटे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, संशयितांनी बेकायदेशीररित्या खोट्या दस्ताऐवजांच्या आधारे संस्थेतील कारभारात हस्तक्षेप करुन लाखो रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी निलेश भोईटे यांनी जिल्हापेठ पोलीसात तक्रार दिली असून त्यानुसार अॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार अमृतराव साळुंखे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा भादंवि कलम ४२०, ४६४, ४६५, ४६८, ४७१, ४७२, १२ब, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.