जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने बाहेरून पदवी घेण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागाच्या पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यासाठीची प्रवेश प्रक्रिया आता विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आली आहे. यात १ ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाइन प्रवेश दिले जाणार आहेत.
ज्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा नोकरी करीत असल्यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही अशा विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व व्यवसाय करणार्या महिला, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती, निवृत्त अधिकारी, कर्मचार्यांना बहि:स्थ पध्दतीत शिक्षण हे अतिशय उपयुक्त ठरणारे आहे.
बहिस्थ पध्दतीत विद्यापीठातून एम.ए. पूर्ण करता येणार आहे. यात मराठी, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, संरक्षणशास्त्र या विषयांमध्ये एम.ए. करता येईल. यासोबत एम.ए. (शिक्षणशास्त्र), एम.कॉम. हे अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत. यासाठी विद्यापीठात नियमीत पदव्युत्तर शिक्षण घेणार्यांचाच पाठयक्रम राहणार आहे. प्रवेशीत विद्यार्थ्यांना विषयानुसार स्वयंअध्ययन साहित्य छापील पुस्तके, मुद्रित, टंकलिखिते व अनुषंगिक तत्सम साहित्य सॉफ्ट कॉपी स्वरुपात देण्यात येणार आहे. याबाबत विद्यापीठाच्या http://www.nmu.ac.in वेबसाईटवर सविस्तर माहिती देण्यात आल्याचे संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी सांगितले आहे.