Home Cities जळगाव गणेशोत्सवासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल सज्ज ; ५ हजारांहून अधिक फोर्स

गणेशोत्सवासाठी जळगाव जिल्हा पोलीस दल सज्ज ; ५ हजारांहून अधिक फोर्स


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गणेशोत्सवाचा उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, नागरिकांनी उत्सव शांततेत व आनंदात साजरा करावा, यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाने व्यापक तयारी केली असून, संपूर्ण जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक पातळीवर दक्षता घेण्यात येत आहे.

जिल्हा पोलीस दलाचे एकूण ३४०० अधिकारी व कर्मचारी, १८०० होमगार्ड आणि एसआरपीएफच्या तुकड्या अशा एकूण ५ हजारांहून अधिक फोर्सची जिल्हाभरात तैनाती करण्यात आली आहे. विशेषतः १६० गावांमध्ये “एक गाव, एक गणपती” उपक्रमांतर्गत होणाऱ्या मूर्ती स्थापना आणि मिरवणुकीसाठी स्वतंत्र नियोजन आखण्यात आले आहे.

उपद्रवी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवरही पोलीस दलाने तात्काळ कारवाई केली असून, १० जणांवर तडीपारीची आणि एका व्यक्तीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, २५५ उपद्रवींना जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले आहे, जेणेकरून सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये.

सोशल मीडियावर होणारी अफवा व आक्षेपार्ह मजकुराची देवाणघेवाण लक्षात घेता, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणताही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अशा पोस्टवर प्रतिक्रिया देणाऱ्या किंवा दुर्लक्ष करणाऱ्या ग्रुप अ‍ॅडमिनवरसुद्धा कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

पोलीस अधीक्षकांनी सर्व गणेश मंडळ कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, उत्सव हा समाजात एकात्मता आणि शांततेचा संदेश देणारा असावा. उत्सवाचा आनंद घ्या, मात्र तो कोणाच्याही भावनांना ठेस पोहोचवणारा किंवा कायदा सुव्यवस्थेला धक्का देणारा नसावा. कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound