सावदा–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा होमगार्डचे तिमाही संमेलन सावदा येथील जेहरा मॅरेज हॉल, रावेर रोड येथे उत्साहात पार पडले. जिल्ह्यातील विविध पथकांमधील होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शिस्त, सुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद आणि आगामी नियोजन या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाल्याने संमेलन फलदायी ठरले.
या संमेलनाचे अध्यक्षस्थान जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री अशोक नखाते यांनी भूषविले. त्यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सावदा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री विशाल पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री रामनाथ काळे, केंद्र प्रमुख श्री गंगाधर महाजन, सामग्री प्रबंधक सुभेदार श्री मदन रावते आणि वरिष्ठ लिपिक श्री पंकज नेरकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

जळगाव जिल्ह्यातील रावेर, सावदा, फैजपूर आणि यावल अशा चार होमगार्ड पथकांनी या संयुक्त तिमाही संमेलनात सहभाग नोंदवला. रावेर पथकाचे समादेशक अधिकारी श्री कांतीलाल तायडे, फैजपूर उपपथकाचे समादेशक अधिकारी श्री विकास कोल्हे, यावल पथकाचे समादेशक अधिकारी श्री विजय जावरे आणि सावदा उपपथकाचे समादेशक अधिकारी श्री दीपक खाचणे यांची उपस्थिती संमेलनासाठी महत्त्वाची ठरली.
संमेलनादरम्यान होमगार्ड दलाच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीवर, सुरक्षा पद्धतींच्या अंमलबजावणीवर आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर प्रतिसाद देण्याच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळात दलाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक दिशा, मार्गदर्शन आणि विविध सूचना अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. सर्व पथकांच्या होमगार्डांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम अधिक यशस्वी केला.



