जळगाव प्रतिनिधी | कोरोनाच्या कटू आठवणींना मूठमाती देत यंदाचा दिपोत्सव हा अतिशय उत्साह आणि चैतन्यदायी वातावरणात साजरा झाला.
गेल्या वर्षी कोरोनाच्या आपत्तीमुळे दिवाळीसाठी तुलनेत थोडी कठोर नियमावली होती. तर, यंदा कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिथीलता देण्यात आली. यामुळे गेल्या वर्षाआधीच्या दिवाळी प्रमाणेच यंदाच्या दिपोत्सवाचा उत्साह दिसून आला.
गेल्या अनेक दिवसांपासून दिवाळीनिमित्त बाजारपेठेत तेजीचे वातावरण होते. अनेक जणांना धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केल्याचेही दिसून आले. तर आज लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने दिवाळीचा आधीप्रमाणेच लखलखाट दिसून आला.
गेल्या वर्षाच्या तुलने यंदा फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाली. तर लक्ष्मी पुजनाचे औचित्य साधून विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांसह घरोघरी लक्ष्मीमातेचे पूजन करण्यात आले. यानिमित्त ठिकठिकाणी दिव्यांची आरास करण्यात आली. तसेच याच्या जोडीला बर्याच ठिकाणी आकर्षक लायटींग देखील करण्यात आल्याचे दिसून आले. एकंदरीत पाहता कोरोनाच्या कटू आठवणींना मागे टाकून यंदा आधीच्याच उत्साहात दिवाळी सण साजरा करण्यात आला.