जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज ब्युरो | जळगाव जिल्ह्यातील सोळा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले असून यात लोकनियुक्त नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या नशिबाचा कौल मतदान यंत्रात बंद होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाच्या वतीने परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. यात जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता भुसावळ, वरणगाव, सावदा, यावल, फैजपूर, रावेर, चोपडा, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, पारोळा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर आणि चोपडा या सोळा नगरपालिका तर मुक्ताईनगर आणि नशिराबाद या दोन नगरपंचायती यांचा समावेश होता. यात जामनेर येथील नगराध्यक्षपदाची निवड ही आधीच बिनविरोध झालेली असून उर्वरत सतरा लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.

या निवडणुकीच्या प्रचारात बऱ्याच ठिकाणी जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. काही ठिकाणी तर राजकारण्यांनी अतिशय खालचा स्तर गाठल्याचे देखील दिसून आले. निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्याचे देखील अनेकदा अधोरेखीत झाले.
या पार्श्वभूमिवर, आज सकाळी साडेसात वाजेपासून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकतेने पार पाडण्यात यावी, आणि मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. तर, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.



