जळगाव, प्रतिनिधी | नवीदिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात २ नोव्हेंबर रोजी पार्किंगच्या कारणावरून पोलीस आणि वकील यांच्यात वाद होवून ते प्रकरण मारहाण व गोळीबार करण्यापर्यंत गेल्याच्या निषेधार्थ येथील जिल्हा बार असोसिएशनतर्फे आज (दि.६) लाल फिती लावून आंदोलन करण्यात आले. तसेच अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांना एक निवेदनही देण्यात आले.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी ३ नोव्हेंबर रोजी केलेल्या ठरावानुसार हे आंदोलन आज जिल्ह्यात करण्यात आले. या घटनेचा वकील संघाने तीव्र शब्दात निषेध केला असून दोषी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जिल्हा बार असो.चे अध्यक्ष अॅड. पी.बी. चौधरी, सचिव अॅड. योगेश गावंडे, यांच्यासह अनेक सभासद या आंदोलनात सहभागी झाले होते.