‘त्या’ दोन नगरसेविका म्हणतात आम्ही भाजपमध्येच : जळगावात पॉलिटीकल लोचा !

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महापालिकेतील चार नगरसेवकांनी आज सकाळी भाजपला जय श्रीराम करून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्याचे वृत्त आल्यानंतर उडालेली खळबळ शांत होत नाही तोच यातील मीनाक्षी गोकुळ पाटील यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नव्हे तर कामांची मागणी करण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो असल्याचे नमूद करत आपण भाजपमध्येच असल्याचे सांगितले आहे. तर मीना सपकाळे या देखील भाजपमध्येच असल्याचे त्यांच्या पतींनी सांगितल्याचा दावा आ. गिरीश महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी केल्याने या प्रकरणातील गोंधळ वाढला आहे.

 

जळगाव महापालिकेतील नाराज नगरसेवकांचा गट मध्यंतरी पुन्हा भाजपमध्ये गेला होता. यामुळे सत्ताधारी शिवसेना महापालिकेत अल्पमतात आल्याने अनेक तांत्रीक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी पाळधी येथे प्रवीण कोल्हे, मीनाक्षी गोकुळ पाटील, प्रिया जोहरे आणि मीना सपकाळे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश घेतल्याने खळबळ उडाली होती. या सर्व नगरसेवकांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सोबत शिवसेनेचा पटका घालूनचे फोटो देखील व्हायरल झाले होते.

दरम्यान, एकीकडे भाजपला पुन्हा खिंडार पाडण्याची माहिती समोर आल्यामुळे महापालिकेतील समीकरणांवर बदलाची चर्चा सुरू असतांनाच दुसरीकडे नगरसेविका मीनाक्षी गोकुळ पाटील यांनी आ. गिरीशभाऊ महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांच्यासह व्हिडीओ जारी करून आपण भाजपमध्येच असल्याचे प्रतिपादन केले. आपण आज सकाळी पालकमंत्र्यांची भेट ही कामांच्या मागणीसाठी घेतली होती. आम्ही भाजपमध्येच होतो, आणि भाजपमध्येच राहणार असल्याचे त्यांनी या व्हिडीओत नमूद केले आहे.

या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधीने अरविंद देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मीनाक्षी गोकुळ पाटील या भाजप सोबतच असल्याचे सांगितले. तर मीना सपकाळे यांचे पती धुडकू सपकाळे यांनी सुध्दा आपण भाजप सोबतच असल्याचे सांगितल्याची माहिती दिली. दरम्यान, याप्रसंगी सुधीर पाटील यांनी सुध्दा दोन नगरसेवक हे भाजपमध्येच असल्याची माहिती दिली आहे. यामुळे दोन नगरसेवक शिवसेनेत गेले नसून भाजपमध्येच असल्याचे अरविंद देशमुख यांनी नमूद केले. तर नगरसेवकांच्या या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे महापालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Protected Content