जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात रात्री पाऊण वाजेच्या सुमारास ऑक्सीजनचा टँकर दाखल झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा श्वास टाकला. यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आपल्या सहकार्यांच्या देखरेखीखाली हा टँकर खाली केला.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा रूग्णालयातील ऑक्सीजनच्या टँकमध्ये उत्पादकांकडून टँकरमधून आलेला प्राणवायू हा स्टोअर करून याला वापरण्यात येते. यात ऑक्सीजनचा टँकर हा गुरूवारी सायंकाळपर्यंत जिल्हा रूग्णालयात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, रात्री नऊपर्यंत हा टँकर आलेला नसल्यामुळे थोडे काळजीचे वातावरण निर्मित झाले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तातडीने सिलेंडर्सच्या मदतीने रूग्णांना पुरेसा प्राणवायू मिळेल अशी व्यवस्था केली. दरम्यान, रात्री उशीरा ऑक्सीजन घेऊन येणार्या टँकर चालकाशी संपर्क साधण्यात आला. यानंतर साधारणत: रात्री पाऊण वाजेच्या सुमारास हा टँकर जिल्हा रूग्णालयाच्या आवारातील ऑक्सीजन स्टोअरेज टँक येथे दाखल झाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे आपल्या सहकार्यांसह या घटनेची माहिती मिळताच थेट ऑक्सीजन स्टोअरेज टँकजवळ ठाण मांडून बसले होते. टँकर आल्यानंतर नियमित प्रक्रिया करून यातील ऑक्सीजन हा स्टोअरेज टँकमध्ये भरण्यात आला. यामुळे काही तासांपासून चिंताग्रस्त बनलेल्या यंत्रणेवरील ताण पहाटेच्या सुमारास कमी झाला.