राजा मयूर यांच्या बंगल्यावर दरोडा : गुंगीचे सरबत पाजून घरगड्याने साधला डाव

 

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरात राहणारे प्रख्यात व्यावसायिक राजा मयूर यांच्यासह दोन सुरक्षारक्षकांना गुंगीचे औषध टाकलेले सरबत पाजून घरातील महिलेला धमकी देत दरोडा टाकल्याचा खळबळजनक घटना काल मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा दरोडा त्यांच्या ठिकाणी काम करणार्‍या एकाने इतर चार जणांच्या मदतीने टाकल्याचे समोर आले आहे.

जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरात राजा ट्रॅक्टरचे मालक राजेंद्र अनिल मयूर उर्फ राजा मयूर वय ८४ हे आपल्या पत्नीसह या ठिकाणी वास्तव्याला आहेत. दरम्यान त्यांच्या बंगल्यावर विकास नेपाळी नावाचा माणूस देखील कामाला होता. राजा मयूर यांच्या घराच्या बाजूलाच त्यांची खोलीत तो राहत होता. या बंगल्यात दोन सुरक्षारक्षक देखील रात्रीला पहारा देत असतात. दरम्यान गुरुवारी ३० मे रोजी रात्री १०.३० वाजता विकास नेपाळी याने भावाला मुलगा झाला असे सांगून सुरक्षारक्षक वसंत श्रीखंडे व उदय समेळ यांना सरबत पाजले. या सरबतमध्ये त्याने गुंगीचे औषध टाकले होते. तसेच त्यांनी हे सरबत राजा मयूर यांना देखील पाजले. त्यामुळे दोनही सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध झाले. त्यानंतर आज पहाटे दोन वाजता विकास नेपाळी याने त्याचे साथीदार असलेल्या चार जणांना बोलावून घेतले. त्यावेळी घरात राजा मयूर यांची पत्नी शैला मयूर यांना बाथरूममध्ये बंद करून त्यांना धमकी दिली. यामुळे त्या घाबरून गप्प बसल्या.

दरम्यान, आरोपी विकास नेपाळी व त्याचे इतर चार अज्ञात साथीदार यांनी मिळून घरातील मुख्य खोली उघडून घरातील सामान अस्ताव्यस्त करून घरातील मौल्यवान वस्तू व सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला.

सकाळी ७ वाजता राजा मयूर हे जैन हिल्स येथे मॉर्निंग वॉकिंगसाठी जातात. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचा चालक कांतीलाल टाक यांनी राजा मयूर यांना फोन लावला, परंतु त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे चालकाने याने त्यांचे भाऊ भरत मयूर यांना फोन करून ते फोन उचलत नसल्याचे सांगितले. त्यानुसार भारत मयूर हे राजा मयूर यांच्या घरी आले असता, हा सर्व प्रकार उघडकीला आला. यावेळी बेशुद्ध अवस्थेत पडलेले सुरक्षारक्षक आणि राजा मयूर हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना उठवून पाणी पाजले. त्यानंतर भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या शैला मयूर यांना देखील धीर दिला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तसेच विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व पथक घटनांसाठी दाखल झाले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content