जळगाव प्रतिनिधी । एलईडीच्या ठेक्यावरून आजच्या महासभेत जोरदार खडाजंगी झाली. मात्र सत्ताधार्यांसह विरोधकांनीही हा ठेका रद्द करण्याची मागणी केली.
याबाबत वृत्त असे की, तब्बल तीन महिन्यानंतर आज सकाळी ११ वाजता महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली महासभा आयोजित करण्यात आली. यामध्ये पाणी पुरवठ्याच्या मुद्यावरून जोरदार चर्चा झडण्याची अपेक्षा होती. मात्र प्रारंभीच नगरसेविका शुचिता हाडा यांनी एलईडी लाईटच्या ठेक्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर याच विषयावरून महासभा गाजली. शहरात बसवण्यात येत असणार्या एलईडी लाईटचा मक्ता रद्द करावा या ही लक्षवेधी मांडून करण्यात आली. भाजपच्या सुचिता हाडा यांनी यांनी या संदर्भातील लक्षवेधी सभागृहात मांडली. शहरात मक्तेदारांमार्फत एलईडी बसवण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम समाधानकारक नसून यासंदर्भात नागरिकांसह नगरसेवक देखील असमाधानी असल्याचे मत यावेळी हाडा यांनी मांडले. या कामात शहराच्या वाढीव भागाचा समावेश नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. वाढीव भागात लाईट व्यवस्था देण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर संबंधीत मक्तेदार हा पार्टली पेमेंट लागत असून हे पेमेंट मिळाल्याशिवाय पुढे काम करण्यास तयार नसल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. एलईडी लाईट लावण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा सर्वे रिपोर्ट तयार नसताना हे का हाती घेण्यात आले अशी विचारणा सौ. हाडा यांनी केली. मक्तेदाराने लावलेले दर हे जास्त असून ते महापालिकेला परवडणारे नसल्याचे सांगत हा मुद्दा प्रशासनाच्या लक्षात का आला नाही, तसेच सभागृहाच्या निदर्शनास का आणून देण्यात आलेली नाही याला जबाबदार कोण आहे ? याची विचारणा केली. महापालिकेचे होणारे नुकसान बघता पुढील महासभेत पर्यंत श्वेतपत्रिका सादर करण्यात यावी अशी सूचना हाडा यांनी सभागृहात मांडली.
शुचिता हाडा या एलईडीबाबत मुद्दा मांडत असतांना शिवसेनेचे ईबा पटेल यांनी सत्ताधारीच विरोधकांची भूमिका बजावत असल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपचे कैलास सोनवणे यांनी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघा पक्षातील नगरसेवक बोलू लागल्याने गोंधळाला सुरुवात झाली. यावेळी कैलास सोनवणे यांनी सभागृहात हा विषय मांडल्याबद्दल अभिनंदन करा अशी भूमिका घेतली. तर सेनेचे नितीन लड्ढा यांनी विरोधकांना बाजू मांडण्याचा अधिकार असल्याची जाणीव सभागृहाला करून दिली. यामुळे सभागृहातील गोंधळात भर पडली. यावेळी लड्ढा यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका असेही सुचविले. एलईडी ठेका रद्द करा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
ज्या मक्तेदाराला एलईडी बसवण्याचे काम देण्यात आलेले आहे तो ते काम वेळेत पूर्ण करेल अशी शक्यता नसल्याने तसेच त्याच्या अटी व शर्ती ह्या महापालिकेच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात असल्याने हा ठेका रद्द करावा असे मागणी नितीन लढ्ढा यांनी सभागृहात केली. मक्तेदार जर महापालिकेला सहकार्य करत नसेल तर हा ठेका आपण रद्द होऊ शकतो असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कैलास सोनवणे यांनी ठेकेदाराला ना. गिरीश महाजन यांनी कामाची पद्धत बदलण्याची सूचना केली असल्याचेही सभागृहात सांगितले. महापौर सीमा भोळे आमदार राजूमामा भोळे आयुक्त यांनी देखील पत्र दिलेले असताना त्याची दखल मक्तेदार घेत नसल्याने सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.