Home क्राईम जळगावातील व्यापाऱ्याची सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक ; ‘रेझर-पे’चा गैरवापर करत गंडा

जळगावातील व्यापाऱ्याची सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक ; ‘रेझर-पे’चा गैरवापर करत गंडा


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील फुले मार्केटमधील एका सुगंधी द्रव्य (Perfumes) विक्रेत्याला ऑनलाईन व्यवहारात तब्बल १ लाख २१ हजार २८३ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने वेगवेगळ्या नावांनी आणि मोबाईल क्रमांकांनी बनावट ऑर्डर्स नोंदवून, ‘रेझर-पे’ पेमेंट गेटवेचा गैरवापर करत ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल विनोद जवाहरानी (वय २६, रा. आदर्श नगर) यांचे फुले मार्केटमध्ये ‘परफ्युम्स बाय जनता शॉपी’ नावाचे दुकान आहे. ते आपल्या वेबसाईटद्वारे (www.perfumesbyis.com) ऑनलाईन परफ्युम विक्रीचा व्यवसाय करतात. संशयित आरोपी रवी कुमार (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने २९ मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत विशाल यांच्या वेबसाईटवरून वारंवार वेगवेगळ्या नावांनी आणि ई-मेल आयडीचा वापर करून ऑर्डर्स दिल्या.

विशाल जवाहरानी यांनी या ऑर्डर्सनुसार कुरियरद्वारे पार्सल पाठवले. मात्र, संशयित आरोपीने अतिशय चलाखीने ‘रेझर-पे’द्वारे केलेले पेमेंट परत मिळवण्यासाठी संबंधित बँकांकडे खोट्या तक्रारी केल्या. यामुळे बँकांनी ही रक्कम विशाल जवाहरानी यांना न देता ‘होल्ड’ करून ठेवली. अशा प्रकारे आरोपीने परफ्युमचे पार्सलही मिळवले आणि भरलेली रक्कमही गोठवून व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सागर शिंपी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound