जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नागेश्वर कॉलनीमधील बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान, शहरात सुरु असलेल्या चोरीच्या सत्रामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन नरेंद्र कुलकर्णी (वय 31 रा. प्लॉट नंबर ४/२ गट नंबर 466, नागेश्वर कॉलनी, महाबळ) हे विद्यापीठात कॉन्ट्रॅक्टर फॅकल्टीमध्ये नोकरीस आहे. श्री.कुलकर्णी हे आपल्या आईसह आपल्या सासरी चोपडा येथे 24 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुलाला पाहण्यासाठी घराला कुलूप लावून गेले होते. दोन दिवसांपासून घर बंद असल्याचे संधी अज्ञात चोरट्यांनी साधली. 24 जून सायंकाळी ६.३० ते बुधवार 26 जून सकाळी ८ वाजेच्या दरम्यान बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील १५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम मंगळसूत्र, १० हजार रुपये रोख, १ हजार रुपये किमतीचे चांदीचे जोडवे आणि ५ हजार रुपये किमतीचे कटलरी सामान चोरून नेला. दोन मजली घर असल्यामुळे खालचा भाग आणि वरच्या खोल्यांमध्ये जाऊन चोरट्यांनी कपाट फोडले. तर घरातील सामान अस्ताव्यस्त केलेला होता.
दोन दिवस मुक्काम झाल्यानंतर आज सकाळी 8 वाजता श्री. कुलकर्णी कुटुंबीय नागेश्वर कॉलनी घरी येताच त्यांना लोखंडी दरवाजा उघडून आणि लाकडी दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर चेतन यांनी रामानंदनगर पोलिसात खबर दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलिस डॉग स्कॉडसह घटनास्थळी दाखल झाले. शेवटचे हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.