जामनेर प्रतिनिधी | म्हशींची वाहने सोडविण्यासाठी पोलिसांनी दोन लाख रूपये स्वीकारल्याबद्दलच्या दोन ऑडिओ क्लीप्स व्हायरल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर पोलिस निरिक्षकांनी मात्र याचा इन्कार करत याबाबत कारवाईचे संकेत दिले आहेत.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
या संदर्भात वृत्त असे की, सध्या दोन ऑडिओ क्लीप्स व्हायरल झालेल्या आहेत. यात पोलिसांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख दिसून येत आहे. पहूर पोलिस ठाण्यासमोरील चहाविक्रेता गोपाल आसलकर यांच्या मोबालवर काही दिवसांपुर्वी फोन आला. समोरील व्यक्ती क्राईम ब्रँच ऑफिसमधून सुरज बोलत असल्याचे सांगते. नंतर आसलकरने पैसे बँक खात्यात घेतल्याचे व ते एका हवालदाराला काढून दिल्याचा संवाद क्लीपमध्ये आहे. संबंधित रक्कम ही म्हशींची वाहतूक करणार्या वाहनांसाठी घेतली गेल्याचे उभयतांच्या संभाषणातून स्पष्ट होते. शेवटी गोपाल आसलकर विनवणी करत मी गरीब असून, या प्रकरणाशी माझे काहीही देणेघेणे नाही, असे ऑडीओ क्लीपमध्ये सांगत आहे.
दरम्यान, दोन्ही ऑडिओ क्लिपमध्ये हिंदीतून संवाद साधण्यात आला आहे. त्यातील एका क्लिपमध्ये एका हवालदाराने चहाविक्रेत्याच्या माध्यमातून पैसे स्विकारल्याचा उल्लेख आहे. तर, पोलिस प्रशासनाने याचे तात्काळ खंडण केले आहे. या संदर्भात पहूर पोलीस स्थानकाचे निरिक्षक अरूण धनवडे म्हणाले की, सुरज नावाची व्यक्ती आम्हाला माहिती देत असते. त्यानुसार आम्ही कारवाई करतो. या घटनेत त्याने सांगूनही आम्ही गाडी सोडली नाही, म्हणून तो नाराज झाला असावा असा अंदाज आहे. व्हायरल झालेल्या क्लिपबाबत मला माहिती नाही. माझ्यापर्यंत कागदावर विषय आल्यास कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.