जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य सरकारने काल जिल्हा दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती केल्यानंतर आज या मंडळाने कार्यभार स्वीकारला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सहकारी दूध संघाची मुदत उलटूनही त्यांना ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ मिळाली होती. यातच काल राज्य सरकारने यावर प्रशासक बसविला असून यामुळे संचालक मंडळ आपोआपच बरखास्त झाले आहे.
कालच्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची जिल्हा दूध संघावर मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रशासकीय मंडळात आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख, ओबीसी सेलचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय भोळे, अमोल चिमणराव पाटील, राजेंद्र वाडीलाल राठोड, अशोक कांडेलकर, अमोल शिंदे, गजानन पाटील आणि विकास पंडित पाटील यांचा समावेश आहे.
दरम्यान, आज रात्री नऊच्या सुमारास नवनियुक्त प्रशासक मंडळाने कार्यभार सांभाळला. जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये आणि प्रशासन प्रमुख डॉ. सी.एम. पाटील यांच्या उपस्थितीत प्रशासकांनी कार्यभार स्वीकारला. यात नवनियुक्त प्रशासक अशोक कांडेलकर, अमोल शिंदे, अरविंद देशमुख आणि अमोल पाटील यांची उपस्थिती होती. यामुळे आजपासून जिल्हा दूध संघावर प्रशासकराज आले आहे.