महत्वाची बातमी : जिल्ह्यातील १० पोलीस स्थानकांचे होणार विभाजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील १० पोलीस स्थानकांचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यातून नवीन स्थानके वा दूरक्षेत्र यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यातील बर्‍याचशा पोलीस स्थानकांवर कामाचा लोड येत असल्याने त्यांचे विभाजन करण्यात यावे अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. या संदर्भात आरटीआय आणि सोशल ऍक्टीव्हिस्ट दीपक कुमार गुप्ता यांनी देखील पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने आता जिल्ह्यातील १० पोलीस स्थानकांचे विभाजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दीपक कुमार गुप्ता यांनी दिली आहे.

यानुसार अमळनेर पोलीस स्थानकाचे विभाजन करून शहर आणि ग्रामीण असे दोन पोलीस स्टेशन्स होणार आहेत. जळगावातल्या एमआयडीसी स्टेशनचे विभाजन होणार असून म्हसावद येथे नवीन पोलीस ठाणे होणार आहे. तर जळगाव शहरचे विभाजन होऊ छत्रपती शिवाजी महाराज नगरसाठी नवीन स्टेशन कार्यरत होणार आहे. पाचोर्‍याचे विभाजन होऊन नगरदेवळा येथे नवीन ठाणे होणार आहे. तर पारोळ्याचे विभाजन होऊन तामसवाडी येथे पोलीस ठाणे होणार आहे. मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे विभाजन होऊन कुर्‍हा-काकोडा येथे नवीन पोलीस ठाणे बनणार आहे. तर, पहूरचे विभाजन होऊन शेंदुर्णी येथे नवीन ठाणे बनणार आहे.

यासोबत भडगावचे विभाजन होऊन कजगाव येथे पोलीस दूरक्षेत्र बनणार आहे. निंभोर्‍याचे विभाजन होऊन ऐनपूर येथे तर मेहुणबार्‍याचे विभाजन होऊन पिलखोड येथे पोलीस दूरक्षेत्र बनणार आहे.

या संदर्भात संबंधीत पोलीस स्थानकांच्या निरिक्षकांना दिनांक १३ मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करण्यात यावेत असे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

Protected Content