जळगाव प्रतिनिधी | जोशीपेठेतील एका घरावर पोलीसांनी धाड टाकून तीन तलवारी जप्त केल्या असून शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने दुपारी 2.30 वाजता ही कारवाई केली. दरम्यान घरमालकाने शस्त्रपुजनावेळी वर्षातून एकदा या तलवारी घराबाहेर काढण्यात येत असल्याचे पोलीसांना सांगितले. याबाबत पोलीसांना न कळविल्याने घरमालक गुणवंतराव राजाराम शिंदे वय ६५ रा. रथचौक, जोशीपेठ याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रथचौक, जोशीपेठेतील रहिवाशी असलेले गुणवंतराव राजाराम शिंदे यांच्या शिवनेरी बिल्डींगमध्ये अनेक तलवारी असल्याची माहिती डीवायएसपी डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव, सुनिल पाटील, किरण धनके, अनिल पाटील, सचिन सांळुखे, महेश पवार यांच्यासह शनिपेठ पोलीसांनी गुरुवारी दुपारी याठिकाणी धाव घेवून घराची झाडाझडती घेतली. यावेळी माळुच्यावर तीन धारदार तलवारी कापडामध्ये लपटलेल्या मिळून आल्या. त्यानंतर रोहन यांच्या पथकाने गुणवंत शिंदे यांच्यासह मुलाला ताब्यात घेवून शनिपेठ पोलीस स्टेशनला आणले.
गुणवंत शिंदे यांच्यासह मुलाला तलवारीसह शनिपेठ पोलीस स्टेशनला नेल्यानंतर वार्डाच्या नगरसेवकाने याठिकाणी धाव घेतली. एका वजनदार मंत्र्याच्या दबावाने गुन्ह्यात मुलाचे नाव वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी रविंद्र मोतीराया याच्या फिर्यादीवरून गुणवंत शिंदे याच्याविरुध्द शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.