
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील श्री जैन युवा फाउंडेशनचा पदग्रहण सोहळा रविवार, २७ जुलै रोजी आदित्य लॉन्स येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात दोन व्यक्तींना ‘जैन युवा रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तर नूतन पदाधिकाऱ्यांनी आगामी कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण यांसह विविध सामाजिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प केला.

या महत्त्वपूर्ण समारंभासाठी माजी खासदार ईश्वरलाल ललवाणी, आमदार राजूमामा भोळे, द्वारका जालान, नयनतारा बाफना, माजी महापौर प्रदीप रायसोनी, गोसेवक अजय ललवाणी, सुवर्ण व्यापारी सुशील बाफना आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्र आणि गणेश वंदनेने झाली. यानंतर मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन केले. मावळते सचिव डॉ. राहुल भन्साली यांनी मागील वर्षभरातील फाउंडेशनच्या कामकाजाचा सविस्तर आढावा सादर केला.
यंदाचा ‘जैन युवा रत्न’ पुरस्कार उपजिल्हाधिकारी नीलम भरत बाफना आणि जलतरणपटू राजश्री आकाश कटारिया यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना दोन्ही मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमात नूतन अध्यक्ष रितेश छोरिया, नूतन सचिव ऋषभ शाह, कोषाध्यक्ष पंकज सुराणा तसेच संचालक मंडळाच्या सदस्यांचा शपथविधी मोठ्या उत्साहात पार पडला. श्री जैन युवा फाउंडेशन गेल्या ७ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यापार आणि सेवा अशा विविध क्षेत्रांत सातत्याने काम करत आहे. ही परंपरा भविष्यातही अखंडितपणे सुरूच राहील, अशी माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली.
पुणे येथून आलेले मुख्य वक्ते द्वारका जालान यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “जीवनात दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे. जर हे शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला नवनवीन गोष्टी कळतात, समजतात आणि तुमच्या ज्ञानात भर पडते. आत्मविश्वास असणे महत्त्वाचे आहे आणि आपल्या गुणांची आपल्याला पारख असायला हवी. वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो, कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते. यासाठी वाचत राहा.” त्यांच्या या विचारांनी उपस्थितांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा देढिया यांनी केले, तर आभार ऋषभ शहा यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन राका, अनीश चांदिवाल, मनोज लोढा, प्रवीण पगारिया, रिकेशकुमार गांधी, दर्शन टाटिया, चंद्रशेखर राका, जयेश ललवाणी, सौरभ कोठारी, राहुल बांठिया, प्रणव मेहता, विनय गांधी, अंकित जैन, अथांग पारख, जिनेश सोगटी, आनंद चांदिवाल, पियूष संघवी, अनिल सिसोदिया, जयेश ललवाणी, दिनेश राका, अमित कोठारी, शैलेश गांधी, दिनेश बाफना, अमोल श्रीश्रीमाल, मनीष लूनिया, पारस कुचेरिया, योगेश सांखला, अमोल फूलफगर, पूर्वेश शाह, संदीप सुराणा, यतिन राका, सुशील छाजेड, तेजस जैन, गौरव पंगारिया, आशीष कांकरिया, शैलेश कटारिया, धीरज पारख, सचिन बोरा, रोहित कोचर, कुशल गांधी, भावेश जैन, रितेश छाजेड, विनोद भंडारी, नमित जैन, पीआरओ प्रवीण छाजेड आदींनी अथक परिश्रम घेतले.



