जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र मनीष जैन यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या तक्रारीवरून मनी लॉंड्रींगच्या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे जैन पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, मे. राजमल लखीचंद प्रा. लि.; आर. एल. ज्वेल्स व मानराज ज्वेल्स प्रा. लि. या फर्मच्या माध्यमातून केलेले व्यवहार संशयास्पद वाटत असल्याने सक्तीवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने नागपुरच्या विशेष पीएमएलए कोर्टात २६ जून रोजी तक्रार दाखल केली होती. यावरील सुनावणीत न्यायालयाने पीएमएलए काद्याच्या अर्थात मनी लॉंड्रींगच्या अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
मे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांनी स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ही इतरत्र वळविण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. याबाबत स्टेट बँकेने आधी सीबीआयकडे तक्रार केली होती. नंतर हे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आले असून हा खटला न्यायालयात सुरू झालेला आहे.
सदर कारवाई करण्याच्या आधी ईडीने १७ ऑगस्ट २०२३ रोजी आर.एल. समूहातील फर्म्सवर छापेमारी केली होती. यात सोने-चांदीच्या दागिन्यांसह अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. यातून केलेल्या तपासातून अनेक बाबी संशयास्पद आढळून आल्यामुळे ईश्वरलाल शंकरलाल जैन व मनीष ईश्वरलाल जैन यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील खटल्यातच आता मनी लॉंड्रींगच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे. यामुळे जैन पिता-पुत्राच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे मानले जात आहे.