कोलकाता (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ताफा जात असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर त्या भडकल्या. त्यांनी या कार्यकर्त्यांवर शिव्या देत असल्याचा आरोपही केला, असा आरोप भाजपच्या स्थानिक शाखेने केला आहे. दरम्यान, भाजप त्याच्या नेहमीच्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनेही केला आहे.
पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या. या घोषणा ऐकताच ममतांनी गाडी थांबवली. त्या गाडीतून उतरून बाहेर आल्या आणि ही घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्या. ममतांनी या कार्यकर्त्यांवर शिव्या देत असल्याचा आरोपही केला. या संदर्भात आपल्या म्हणण्याचा पुरावा म्हणून स्थानिक भाजपा शाखेने एक व्हिडिओही सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
चंद्रकोण येथील आरामबाग जागेवर ममता यांची रॅली जात होती. भाजप जाणूनबुजून लोकांना चुकीचं वर्तन करायला पाठवतो, असे ममता म्हणाल्या. हा भाग पश्चिम मिदनापूरमधला तृणमूलचा गड समजला जातो. भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटने हा व्हिडिओ ट्विट केला असून दिदी जय श्रीरामच्या घोषणांनी इतक्या नाराज का आणि या घोषणांना शिव्या का म्हणतात ? अशी पोस्टही लिहिली आहे.