Home Cities जळगाव राज मालती नगरमध्ये जगद्गुरु संत रोहिदास महाराज जयंती साजरी 

राज मालती नगरमध्ये जगद्गुरु संत रोहिदास महाराज जयंती साजरी 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जगद्गुरु संत रोहिदास महाराज चर्मकार बहुउद्देशीय संस्थेतर्फे राज मालती नगर येथील संत रोहिदास महाराज समाज मंदिरात जगद्गुरु संत रोहिदास महाराज यांची जयंती अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक व खजिनदार विजय हिरामण अहिरे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाल्याने यंदाची पारंपरिक जयंती मिरवणूक रद्द करण्यात आली होती. मात्र समाजाच्या श्रद्धा आणि परंपरेनुसार महाआरती व प्रसादाचे आयोजन करून जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन व महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी संत रोहिदास महाराजांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा गौरव केला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा, शिक्षण आणि आत्मसन्मान यांचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी भगवान बाविस्कर (महानगर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ), संस्थाध्यक्ष किशोर धोरे, उपाध्यक्ष विजय खजुरे, सचिव दीपक मेथे, सहसचिव संतोष धोरे यांच्यासह नरेंद्र विसावे, गणेश धोरे, अशोक बेरभैय्या, हिंमत मोरे, सुनील वाघ, कैलास भारुळे, रवी जाधव, संजय अहिरे आदी मान्यवर व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान संस्थेचे संस्थापक विजय हिरामण अहिरे यांच्या कार्याची आठवण काढत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. समाजकार्य, संघटन आणि सेवाभावासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

एकूणच, मिरवणूक रद्द असली तरी श्रद्धा, एकजूट आणि सामाजिक बांधिलकी जपत संत रोहिदास महाराजांची जयंती साधेपणाने व भक्तिभावात साजरी करून समाजाने आदर्श घालून दिला.


Protected Content

Play sound