धनंजय मुंडेकडून राजीनामा मागणे योग्य नाही : छगन भुजबळ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मला मंत्री व्हायचे आहे म्हणून कुणाचातरी राजीनामा घ्यावा हे माझ्या मनातही नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की पूर्ण चौकशी झाली की आका, काका सगळ्यांवर कारवाई करु. त्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला जातो आहे? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले, जोपर्यंत नक्की होत नाही, ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची घाई का? त्यांनी राजीनामा का द्यावा आणि कुणी मागावा? साप साप म्हणून भुई थोपटणं योग्य नाही. कारण नसताना, काहीही सिद्ध झालेलं नसताना राजीनामा घेणं मी तेलगी प्रकरणात सोसलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले. राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात. मला वाटतं की कुणावरही अन्याय होता कामा नये.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाली. सुरेश धस यांनी या हत्येचे क्रौर्य सांगितले. ते ऐकतानाही अंगावर काटा आला. त्यामुळे या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत वाईट पद्धतीने झाली. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, पण कायदा सांगतो त्याप्रमाणे जो निरपराध अपराध्याला शिक्षा होता कामा नये. मी कुणाची बाजू घेतो आहे असे अजिबात नाही. जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

Protected Content