Home आंतरराष्ट्रीय इजरायलचा हवाई हल्ला ; इराणमधील 51 विद्यार्थिनींचा मृत्यू

इजरायलचा हवाई हल्ला ; इराणमधील 51 विद्यार्थिनींचा मृत्यू


नवी दिल्ली – वृत्तसेवा । दक्षिण इराणमधील मिनाब शहरात मुलींच्या शाळेवर झालेल्या कथित अमेरिका-इजरायल हवाई हल्ल्यात 51 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर इराणमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून सरकारने तत्काळ प्रतिकारात्मक कारवाई सुरू केल्याचा दावा केला आहे.

इराणची सरकारी वृत्तसंस्था (IRNA) यांच्या अहवालानुसार, होर्मोजगान प्रांतातील मिनाब येथे सुरू असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान एका गर्ल्स स्कूलवर हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात 51 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने आज सकाळी अमेरिकेने ‘जायोनिस्ट शासनासोबत’ मिळून देशातील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केल्याचा आरोप केला आहे. परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अशा कारवायांमुळे इराणी जनता दबावाखाली येईल, असा शत्रूचा समज चुकीचा ठरेल. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सशस्त्र दलांनी प्रतिकारात्मक कारवाई सुरू केल्याचेही परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत देशातील शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यात आली आहेत. बँकिंग सेवा सुरू राहतील, मात्र सरकारी कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यरत राहतील, असे सरकारने जाहीर केले आहे. आवश्यक वस्तू आणि सेवांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांचा तीव्र निषेध करताना म्हटले आहे की, अमेरिकेने आणि इस्रायलने देशाच्या प्रादेशिक अखंडतेचे व सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे. संरक्षण ठिकाणे, पायाभूत सुविधा आणि नागरी भागांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप मंत्रालयाने केला आहे. संभाव्य लष्करी धोक्याची जाणीव असूनही इराणने आंतरराष्ट्रीय समुदायासोबत संवादाचा मार्ग स्वीकारला होता, असेही मंत्रालयाने नमूद केले.

‘आम्हाला युद्ध नको होते,’ असे स्पष्ट करत मंत्रालयाने सांगितले की, इराणी जनतेने युद्ध टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र सध्याच्या परिस्थितीत देशाचे संरक्षण करणे आणि शत्रूच्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर देणे अपरिहार्य बनले आहे. इराण कोणत्याही युद्धाला सक्षमपणे उत्तर देऊ शकतो आणि सशस्त्र सेना आक्रमण करणाऱ्यांना कठोर व निर्णायक प्रत्युत्तर देईल, असा इशाराही देण्यात आला आहे. इतिहास साक्षी आहे की इराणने कधीही बाह्य दबावासमोर झुकले नाही, असेही निवेदनात ठामपणे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आता या घडामोडीकडे लागले असून परिस्थिती पुढे कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


Protected Content

Play sound