Home आंतरराष्ट्रीय इस्त्रायल-हमास युद्ध १५ महिन्यानंतर थांबणार; युद्धविरामाला सहमती

इस्त्रायल-हमास युद्ध १५ महिन्यानंतर थांबणार; युद्धविरामाला सहमती


दोहा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इस्रायल आणि हमासदरम्यान गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी करार करण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झाल्याचे वाटाघाटींची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याने ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला सांगितले. युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या पाठिंब्याने इजिप्त आणि कतारच्या पुढाकाराने अनेक महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. त्याला अखेर बुधवारी यश आले. मात्र, यासाठीचा करार अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

हमासने ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १२०० नागरीक आणि सैनिकांची हत्या केली होती आणि २५० पेक्षा जास्त लोकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये केलेल्या युद्धात ४६ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले. त्यामध्ये महिला आणि मुलांची संख्या जवळपास दोन-तृतियांश इतकी आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, युद्धविरामासाठी सहा आठवड्यांची योजना आखण्यात आली आहे. त्यामध्ये इस्रायली फौजा गाझामधून टप्प्याटप्प्याने माघार घेतील आणि इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कच्च्या कैद्यांच्या बदल्यात हमासच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची सुटका केली जाईल. हमासने ‘रॉयटर्स’ला सांगितले की, त्यांच्या शिष्टमंडळाने वाटाघाटी करणाऱ्या मध्यस्थांकडे युद्धविराम करार आणि ओलिसांची सुटका याला मान्यता दिली आहे. त्यापूर्वी हमासने तोंडी मान्यता दिली होती असे पॅलेस्टाईनच्या अधिकाऱ्याने सांगितले. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडियन सार युरोपच्या दौऱ्यावर होते, आपण या करारासंबंधी बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी मायदेशी परत जात असल्याचे त्यांनी जाहीर केले.


Protected Content

Play sound