Home राजकीय पुणे जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा नाही का? यावर शरद पवारांचे...

पुणे जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा नाही का? यावर शरद पवारांचे स्पष्ट वक्तव्य अकोल्यात


अकोला-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। पुण्यातील मुंढवा परिसरातील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ‘अमेडिया कंपनी’च्या नावाने झालेल्या या व्यवहारात पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले असून, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी शनिवारी अकोल्यात पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली.

अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची तब्बल ९९ टक्के मालकी असल्याचे समोर आले आहे, तर दिग्विजय पाटील यांची केवळ १ टक्के हिस्सेदारी आहे. या व्यवहारात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला असताना पार्थ पवारांवर कारवाई का झाली नाही, असा थेट प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी फारसं काही न बोलता केवळ एका वाक्यात उत्तर देत विषय संपवला — “महाराष्ट्राचे गृहमंत्रीच याचं उत्तर देऊ शकतील, मी देऊ शकत नाही.”

या प्रतिक्रियेने उपस्थितांना काही क्षण शांतता लाभली, मात्र त्यानंतर पवारांनी या प्रकरणाच्या गंभीरतेबाबत आपले मत स्पष्ट केले. “मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर असल्याचे म्हणत असतील, तर त्यांनी चौकशी करावी आणि त्याचे वास्तव समाजासमोर मांडावे. हे काम त्यांच्याच हाती आहे,” असेही ते म्हणाले.

मुंढव्यातील हा जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केल्याचे त्यांनी नमूद केले. “सरकारी अधिकाऱ्यांनी पुराव्यांच्या आधारे निर्णय घेतला असेल, त्यांच्याकडे त्यासाठी पुरेशी कागदपत्रे असतील,” असे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, शीतल तेजवानी आणि अन्य आरोपींबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले, “मला या नावांची माहिती नाही. आरोप ज्यांनी केले आहेत, त्यांनीच त्याची तपासणी करावी,” असा सल्ला देत पवारांनी विषय संपवला.


Protected Content

Play sound