तेहरान – वृत्तसेवा । मध्यपूर्वेत सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाला आता 15 दिवस पूर्ण झाले असून या युद्धात नव्या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. इराणने आपल्या नव्या युद्धनीतीनुसार अत्याधुनिक ‘359’ मिसाईलचा वापर सुरू केल्याची माहिती समोर येत असून या शस्त्रामुळे अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी यंत्रणांना मोठे आव्हान निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षात दोन्ही बाजूंना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र अलीकडील काही दिवसांत इराणकडून करण्यात आलेल्या अचूक मिसाईल हल्ल्यांमुळे परिस्थितीत काहीसा उलटफेर झाल्याचे लष्करी विश्लेषकांचे मत आहे. इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलमधील काही लष्करी ठिकाणांवर मोठा परिणाम झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याचवेळी आखाती देशांमधील अमेरिकेच्या काही सैन्यतळांवरही इराणने अचूक लक्ष्य साधत हल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे.

या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे काही सैनिक मृत्युमुखी पडल्याची माहिती विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर गंभीर आरोप केले असून अमेरिकेच्या सैन्यतळांची गुप्त माहिती इराणपर्यंत पोहोचवल्याचा दावा केला आहे. मात्र रशियाने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपला या संघर्षाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इराणने युद्धात ‘359’ नावाचे नवे अत्याधुनिक मिसाईल वापरण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. हे मिसाईल जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या शस्त्रांच्या श्रेणीत मोडते. ‘359’ हे ‘358’ मिसाईलचे सुधारित आणि अधिक प्रगत आवृत्ती असल्याचे सांगितले जात आहे. या मिसाईलची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे ते लक्ष्य साधण्यासाठी पारंपरिक रडार प्रणालीवर अवलंबून राहत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हे मिसाईल हवेत सोडल्यानंतर स्वतः लक्ष्याचा शोध घेऊन त्यावर हल्ला करू शकते. ट्रकसारख्या मोबाईल लाँचरमधून हे मिसाईल डागता येते आणि ते हवेत काही काळ फिरत राहून शत्रूच्या ड्रोन किंवा हवाई साधनांचा शोध घेते. त्यानंतर लक्ष्य निश्चित झाल्यावर ते थेट हल्ला करून ते नष्ट करण्याची क्षमता या मिसाईलमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी इराणच्या ‘358’ मिसाईलच्या मदतीने अमेरिकेचे MQ-9 रीपर आणि इस्रायलचे हर्मीस 900 प्रकारचे काही ड्रोन पाडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे अमेरिका आणि इस्रायलच्या ड्रोन प्रणालींसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे मानले जात आहे. नव्या ‘359’ मिसाईलचा वेग ताशी सुमारे 740 किलोमीटर इतका असल्याची माहितीही समोर आली आहे.
या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युद्ध लांबल्यास जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.



