मुंबई-वृत्तसेवा । । मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने महत्त्वाची ‘हॉर्मूज सामुद्रधुनी’ बंद केल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलदर झपाट्याने वाढले असून त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. परिणामी भारतीय रुपयानेही विक्रमी घसरण नोंदवत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 94 चा टप्पा ओलांडला आहे.
इराणकडून सध्या या सामुद्रधुनीतून केवळ मित्र राष्ट्रांच्या जहाजांनाच परवानगी दिली जात असल्याने जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल या मार्गाने वाहतूक होते, त्यामुळे हा मार्ग बंद झाल्याने बाजारात अनिश्चितता वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी उसळी पाहायला मिळत असून, आयात-आधारित देशांवर विशेषतः भारतावर त्याचा मोठा फटका बसत आहे.

दरम्यान, भारतीय चलन रुपयाने शुक्रवारी ऐतिहासिक घसरण नोंदवली. दिवसाच्या व्यवहारात रुपया प्रति डॉलर 94.84 पर्यंत घसरला होता, तर शेवटी तो 94.81 वर स्थिरावला. ही आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण मानली जात असून चालू आर्थिक वर्षात रुपयात तब्बल 11 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या दशकातही इतकी मोठी घसरण झालेली नव्हती, त्यामुळे आर्थिक वर्तुळात चिंता वाढली आहे.
रुपयाच्या घसरणीमागे केवळ जागतिक तणावच नव्हे, तर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून सातत्याने काढलेली गुंतवणूकही कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढली असून त्याचा परिणाम विकसनशील देशांच्या चलनांवर दिसत आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमतीत होत असलेले चढ-उतार पुढील काही आठवड्यांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. जर तेलदर आणखी वाढले, तर रुपयावर अधिक दबाव येऊ शकतो. याचा परिणाम देशातील महागाईवर होण्याची शक्यता असून पेट्रोल, डिझेलसह इतर वस्तूंच्या किमती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर जगभरात मोठ्या इंधन संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हॉर्मूज सामुद्रधुनी बंद झाल्याने अनेक देशांचा कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठा ठप्प झाला आहे. भारतासारख्या आयात-आधारित देशांना याचा सर्वाधिक फटका बसत असून ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.



