मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी तीन वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होईल. दरम्यान, शपथविधीच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये खासदार शरद पवार यांचादेखील समावेश आहे. त्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार यावेळी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीही शपथ घेतील. फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवार यांना फोन करून शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्यामुळे शरद पवार यांना शपथविधीच्या कार्यक्रमाला येता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना देखील आजच्या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनादेखील या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच मैत्री वाढली होती. लोकसभेवेळी राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली. त्याचबरोबर राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक आहे. त्यामुळे शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिले असले तरी राज ठाकरे सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आज दुपारी तीन वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच कार्यक्रमात अजित पवार हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत अस्पष्टता होती. मात्र आता शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तेदेखील याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती. फडणवीस यांचा भाजपा हा पक्ष महायुतीमध्ये आहे तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. हा विरोध निवडणुकीदरम्यान प्रखरतेने दिसला होता. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीका केली होती. मात्र आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन कॉल करून शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळातून स्वागत केले जात आहे.