गुटखा तस्करीची सखोल चौकशी करा; शिवसेनेची मागणी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परराज्यातून मुक्ताईनगर तालुक्यात अवैधरित्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे. यासह इतर अवैध धंदे देखील सुरू असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर असल्यामुळे गुटखा तस्करांसाठी प्रमुख मार्ग ठरत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पोलीस व अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकारी तस्करांशी अर्थपूर्ण साटेलोटे करून तस्करीला पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नुकतेच दोन ते तीन दिवसांपूर्वी सुमारे २ कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या आधीही लाखो रुपयांचा गुटखा तस्करीसाठी पकडण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, जळगाव येथून येणाऱ्या पथकांनी ही कारवाई केली, परंतु स्थानिक पोलिसांनी या कारवायांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. दुसरीकडे बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील देखील गुटखा वाहतूकीवर कारवाई करण्यात आली. परंतू ते प्रकरण देखील दाबण्यात आल्याची चर्चा देखील या परिसरात होत आहे.

दरम्यान, अवैध गुटख्याची तस्करीत मोठे रॅकेट सक्रिय असून स्थानिक पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारात सुनिल पाटील यांनी निवेदनातून केली आहे.

Protected Content