अतिरिक्त साठवण तलावाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा; यावल भाजपाची मागणी

यावल प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या अतिरिक्त साठवण तलावाच्या बांधकामात पावणे दोन कोटी रूपयाचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावल तालुका भाजपाने आज आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

या संदर्भात नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांनी दोन दिवसापुर्वी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांची भेट घेवुन त्यांचेकडे यावल नगरपालिकेने उभारलेल्या अतिरिक्त साठवण तलाव वाचे कामात दोन कोटी रुपयाचा अपहार केल्याची लिखित तक्रार देत चौकशीची मागणी केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रष्ठाचाराच्या चौकशीच्या मागणीला भाजपाने समर्थन दिले असून याची चौकशीची मागणी केली आहे.

यावल शहरातील भाजपा कार्यालयात तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी आज बुधवारी २९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बाळू फेगडे, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, शहराध्यक्ष डॉ. निलेश फेगडे, गोपालसिंह पाटील, पी. एस. सोनवणे आदींची उपस्थिती होती. गेल्या पाच वर्षांत शहराचा कोणताही विकास न करता सर्वानुमते केवळ विकासाचा गवगवा केला आहे.  पालिकेने नव्याने उभारलेल्या साठवण तलावाचे कामात १ कोटी ८० लाखाचा अपहार केल्याचा आरोप खुद नगराध्यक्षा नौशाद तडवी व पाच नगरसेवकांनी केल्याची तक्रार केली असल्याने सर्व सामान्य जनतेचा संशय बळावला आहे. आतापर्यंत यावल शहराच्या विविध प्रकारच्या दाखण्यात आलेल्या विकास कामात सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित असल्याचा देखावा होत होता, मात्र मागील काही दिवसांपासुन त्यांच्यात गटबाजी झाल्याने  अंतर्गत कलहामुळेच अपहाराची बाब चव्हाट्यावर आली असल्याचेही माहिती भाजपाने पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

साठवण तलावाचे जागेचे मोजमाप न करणे, आराखड्यानुसार काम न करणे, कंत्राटदारास घाईघाईने बिले अदा करणे यामुळे भ्रष्टाचाराच्या संशयास वाव मिळत असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली. साठवण तलावाच्या लगतच असलेल्या राकेश जगन्नाथ पाटील व पराग जगन्नाथ पाटील या दोन्ही बंधूची जमीन अतिक्रमित करून पालिकेने त्यावर साठवण तलाव उभारल्याने व शेतकरी बंधू याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याने पालिकेला न्यायालयीन लढ्यासाठी सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.  विकास निधी हा जनतेचा पैसा असून यात झालेल्या अपहार सारख्या गंभीर प्रकरणाचा त्यांनी तीव्र निषेध ही व्यक्त केला आहे.

 

Protected Content