Home Cities भुसावळ भुसावळमध्ये राष्ट्रवादी उमेदवारांच्या मुलाखती; मंत्री माणिकराव कोकाटे व माजी मंत्री अनिल पाटील...

भुसावळमध्ये राष्ट्रवादी उमेदवारांच्या मुलाखती; मंत्री माणिकराव कोकाटे व माजी मंत्री अनिल पाटील यांची उपस्थिती

0
219


भुसावळ–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तर्फे उमेदवार निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेअंतर्गत जनसंपर्क मंत्री माणिकराव कोकाटे आणि माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. संतोषी माता हॉल येथे झालेल्या या मुलाखतींना यावल, चोपडा, रावेर, सावदा, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जामनेर या नगरपालिका व नगरपंचायतींतील अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती दर्शवली.

या मुलाखतीदरम्यान उमेदवारांच्या कार्यक्षमता, संघटनातील सहभाग, जनसंपर्क आणि मतदारसंघातील सामाजिक कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, निवडणूक समिती सदस्य आणि जिल्हा स्तरावरील नेते या प्रक्रियेत उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आगामी निवडणुकांसाठी मजबूत, जनाधार असलेले आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय उमेदवार देण्याचा निर्धार या बैठकीत दिसून आला.

मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रसंगी संवाद साधताना सांगितले की, “जनतेच्या मनात काही ठिकाणी नाराजी आहे, कारण अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांक भागात विकासाची कामे झालेली नाहीत. मात्र मी या राज्याचा अल्पसंख्यांक मंत्री असल्याने यापुढे विकासाच्या कामांबाबत चिंता करण्याची गरज नाही. माझ्याकडे जर कोणी एक रुपया मागितला तर मी दोन रुपये देईन. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे जितके जास्त नगरसेवक निवडून येतील, तितका अधिक निधी मी उपलब्ध करून देईन.”

कोकाटे यांच्या या विधानाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, उपस्थित उमेदवारांनी उत्साहात सहभाग नोंदवला. अनिल भाईदास पाटील यांनीदेखील आगामी निवडणुकांमध्ये पक्षाच्या वचनबद्धतेवर भर देत सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ही विकास आणि कार्यक्षमतेच्या बळावरच जनता जिंकणार आहे.”

या मुलाखतींच्या माध्यमातून पक्षाने जिल्ह्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये स्थानिक पातळीवरील संघटनशक्ती बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. भुसावळसह संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमाने पक्षाच्या निवडणूक मोहिमेला गती मिळाल्याचे दिसून आले.

या घडामोडींमुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, आगामी निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


Protected Content

Play sound