Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर येथे भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 

मुक्ताईनगर येथे भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 

0
233

मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. मुक्ताईनगर येथील खासदार संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या प्रक्रियेत जिल्हा निवडणूक प्रभारी तथा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि आमदार अमोल जावळे उपस्थित होते.

भाजपामार्फत एकूण ३८ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या, ज्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ८ आणि नगरसेवक पदासाठी ३० कार्यकर्ते सहभागी झाले. नगराध्यक्ष पद हे यंदा महिला राखीव असल्याने महिलांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. या पदासाठी नजमा इरफान तडवी, भावना ललित महाजन, निता प्रविण पाचपांडे, तहजीब बी सना जहांगिर खान, गायत्री विनोद सोनवणे आदी इच्छुकांनी आपली दावेदारी सादर केली आहे.

मुलाखतीदरम्यान उमेदवारांकडून त्यांच्या कार्याचा आढावा, स्थानिक समस्या आणि निवडणुकीसाठी आखलेले धोरण जाणून घेण्यात आले. मंत्री संजय सावकारे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना सांगितले की, “भाजप ही संघटनशक्ती आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीसाठी ओळखली जाते. नगरपंचायतीत बहुमत मिळवून मुक्ताईनगरचा सर्वांगीण विकास हा आमचा उद्देश आहे.”

या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल जवरे, तालुकाध्यक्ष (उत्तर) मोहन महाजन, तालुकाध्यक्ष (दक्षिण) जयपाल बोदडे, तालुका सरचिटणीस पंकज कोळी, उमेश कोळी, अतुल महाजन, चंद्रकांत भोलाणे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुलाखतींच्या या प्रक्रियेमुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, उमेदवार निवडीचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत भाजपाची रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.


Protected Content

Play sound