पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या सभागृहात केले. या मुलाखतींना शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नगराध्यक्षपदासाठी ३ ते ४ तर नगरसेवकपदासाठी तब्बल ६० ते ६५ इच्छुकांनी मुलाखती दिल्याने पारोळ्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
या मुलाखतींना राज्याचे मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश दादा चव्हाण, जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, आमदार राजू मामा भोळे, खासदार स्मिता वाघ, पी.सी. आबा पाटील, तालुकाध्यक्ष गोविंद आबा शिरोळे आणि शहरातील प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या निवड समितीने उमेदवारांच्या कार्याचा आणि जनाधाराचा तपशीलवार आढावा घेतला.

गेल्या निवडणुकीत पारोळा नगरपरिषदेत भाजपचा नगराध्यक्ष आणि अनेक नगरसेवक निवडून आले होते. या वेळी देखील शहरात पक्षासाठी अनुकूल वातावरण असून भाजपचा नगराध्यक्ष आणि मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला.
शहरातील नागरिकांनी भाजपला मोठ्या अपेक्षेने पाहत असल्याचे आमदार राजू भोळे म्हणाले. “नगरसेवकपदासाठी मुलाखत देणारे सर्वच उमेदवार समाजसेवेची ओढ असलेले आणि शहराचा विकास साधणारे आहेत,” असे ते म्हणाले. पारोळा शहराच्या विकासासाठी योग्य आणि प्रामाणिक उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न निवड समिती करणार असल्याचे तालुकाध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी स्पष्ट केले.
मुलाखतीदरम्यान माजी नगराध्यक्ष सुरेंद्र भाऊ बोहरा, माजी नगरसेविका रेखाताई चौधरी, जिल्हा आघाडीचे अध्यक्ष नाना पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अॅड. कृतिका आफे, रवींद्र पाटील, धरणगावचे राजू दादा सोनवणे, पराग मोरे, रोहन मोरे, मंगेश तांबे, धीरज महाजन, सचिन गुजराती यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मुलाखतींमुळे पारोळा शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत पारोळा भाजपाचा गड ठरणार, अशी अपेक्षा पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली.



