
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. अशाच कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकारी म्हणून निंभोरा पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ. मीरा देशमुख या आज परिसरातील अनेक महिलांसाठी आणि मुलींसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखताना गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवत त्यांनी आपल्या कार्यातून आदर्श अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल २९ गावांचा कारभार सांभाळण्याची मोठी जबाबदारी सौ. देशमुख यांच्या खांद्यावर आहे. या विस्तीर्ण क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्या २५ पोलिस कर्मचारी आणि तीन पोलिस उपनिरीक्षकांच्या मदतीने सातत्याने काम करत आहेत. शिस्तबद्ध कामकाज, निर्णयक्षमता आणि धाडसी कार्यपद्धतीमुळे त्यांची कामगिरी एखाद्या प्रेरणादायी कथेसारखी वाटते.
सौ. मीरा देशमुख या मूळच्या अहिल्यानगर (अहमदनगर) येथील असून त्यांनी मानसशास्त्र विषयात एम.ए.पर्यंत शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत पोलिस सेवेत पोलिस उपनिरीक्षक म्हणून प्रवेश केला. मेहनत, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी पुढे सहाय्यक पोलिस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे.
त्यांचे पती देखील पोलिस सेवेत कार्यरत असून संभाजीनगर येथे सह पोलिस निरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. सौ. देशमुख यांनी यापूर्वी जळगाव तसेच रावेर पोलिस ठाण्यातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रावेर येथे कार्यरत असताना त्यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास प्रभावीपणे हाताळत आपल्या कार्यकुशलतेची छाप उमटवली होती.
सध्या त्या निंभोरा पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून मागील तीन महिन्यांपासून सेवा बजावत आहेत. या काळात त्यांनी चोरी तसेच अवैध दारूविरोधात “वॉश आऊट” मोहीम राबवून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवले आहे. त्यांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांबद्दल विश्वासही अधिक दृढ झाला आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना सौ. देशमुख यांनी सांगितले की, महिलांनी आणि मुलींनी आयुष्यात काय साध्य करायचे आहे हे स्पष्ट ध्येय निश्चित केले तर यश नक्की मिळते. आजच्या काळात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी खचून न जाता चिकाटीने अभ्यास आणि प्रयत्न केल्यास प्रशासकीय सेवा, आयटी क्षेत्र तसेच इतर अनेक क्षेत्रांत महिलांसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.



