मुंबई – राज्य सरकारने कालच मिशन बिगिन अगेनच्या चौथ्याटप्प्याची घोषणा करत जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पासची अट रद्द केली. या निर्णयानंतर मध्य रेल्वेने उद्यापासून महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाचे बुकिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत मध्य रेल्वेने एक पत्रक जारी केलं असून यामध्ये, पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचं म्हंटलं आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी मार्चमध्ये देशव्यापी लॉक डाऊन लागू करण्यात आल्याने प्रवासी वाहतूक करणार्या रेल्वेगाड्या बंद होत्या. मात्र आता टप्प्याटप्प्याने सर्वकाही पुन्हा पूर्वपदावर येत असून यात उद्यापासून जिल्हांतर्गत रेल्वे प्रवासाची भर पडणार आहे.
तत्पूर्वी, राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन-४च्या गाईडलाईन्स काल जाहीर केल्या. यामध्ये मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी, राज्यात एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास रद्द करत सरकारने मोठा दिलासा दिला.